पुणे : लॉकडाऊननंतर एसटी महामंडळाने आता आंतरराज्य बससेवाही सुरू केली आहे. पुणे व पिंपरी -चिंचवडमधून इंदौर, पणजी, बडोदा, सुरज यांसह कर्नाटकातील गुलबर्गा, विजापुर आदी ठिकाणी बस धावत आहे. मात्र, लॉकडाऊनपुर्वी मिळणारा प्रतिसाद सध्या मिळत नाही. बहुतेक बसमध्ये क्षमतेच्या जवळपास ६० टक्के प्रवासी असून हा प्रतिसाद वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यांतर्गत बससेवेप्रमाणे एसटीच्या आंतरराज्य बसच्या फेऱ्याही वाढू लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यात जवळपास एक हजार बस आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील स्वारगेट व शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड बसस्थानकातून आंतरराज्य बस धावतात. सर्वाधिक बस कर्नाटक राज्यामध्ये ये-जा करतात. कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, विजापुर आणि गाणगापुर या ठिकाणी बस जातात. तसेच कर्नाटक राज्य महामंडळाच्या बसही पुण्यात येतात. पुण्यातील स्वारगेट व पिंपरी-चिंचवड स्थानकांतून प्रत्येकी दररोज किमान एक बसफेरी होते. तसेच या दोन स्थानकांसह शिवाजीनगरमधून पणजी मार्गावरही बस धावतात. दोन स्थानकांतून हैद्राबादकडेही बस धावत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली. स्वारगेट बसस्थानकाचे आगार प्रमुख सचिन शिंदे यांनी प्रतिसाद वाढत असल्याचे सांगितले. लॉकडाऊनपुर्वीपासून या बस सुरू आहेत. पण तेव्हाचा प्रतिसाद आता मिळत नाही. पण किमान ५० ते ६० टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---
लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी शिवशाही, स्लीपर किंवा निमआराम बसला प्राधान्य दिले जात आहे. तसेच तिकीट दर कमी राहावा यासाठी इंदौर या लांबपल्ल्याच्या मार्गावर साधी बस सोडण्यात येते. शिवाजीनगर स्थानकातून या मार्गावर बस जाते. तसेच गुजरातमधील बडोदा आणि सुरज या मार्गांवरही बस धावत असून दररोज एक बस ये-जा करते. पणजीसाठी पाच बस असल्याचे आगारप्रमुख अनिल भिसे यांनी सांगितले.
--
या मार्गावर धावतात बस
स्वारगेटहून - हैद्राबाद, पणजी, विजापुर, बिदर, गुलबर्गा, गाणगापुर.
शिवाजीनगरहून - इंदौर, पणजी, बडोदा, सुरत.
पिंपरी चिंचवडहून - पणजी, बिदर विजापुर, गाणगापुर, गुलबर्गा, हैद्राबाद.