पुणे : कायदा सर्वस्पर्शी असून व्यक्तीच्या प्रत्येक टप्प्यावर कायद्याचा संबंध येत असतो. त्यामुळे कायद्याचे सोप्या भाषेत रूपांतर करून उपलब्ध करून दिले, तर सामान्य माणसाला कायदा समजणे सोपे होते. न्यायदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, अशी अपेक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी व्यक्त केली.‘स्वाधार’च्या संस्थापिका मीनाक्षी आपटे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभात भाटकर बोलत होत्या. ‘महिलांना स्वत:च्या हक्कांची आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती असायला पाहिजे,’ या हेतूने स्वाधारने ‘मार्ग, नवी दिल्ली’ यांच्या कायदेविषयक हिंदी पुस्तिकांचे मराठी रूपांतर २००० मध्ये उपलब्ध करून दिले. त्यानंतर काही नवीन कायदे झाले आणि काही जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या. त्या सर्वांचा समावेश असणाऱ्या कायदेविषयक पुस्तकांच्या पुनर्निर्मित संचाचे प्रकाशन या वेळी झाले. त्याचे प्रकाशन भाटकर यांच्या हस्ते झाले.सी. एम. दीक्षित, स्वाधारच्या अध्यक्षा सरिता भट, उपाध्यक्षा सुनंदा टिल्लू व सचिव संजीवनी हिंगणे व्यासपीठावर होते.कायद्याची ओळख होणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. स्वाधारने महिलांविषयक कायद्याच्या हिंदीतील पुस्तिकांचे मराठीत भाषांतर करून त्या पुनर्निर्मित केल्या हे खरोखर अभिनंदनीय आहे, असे सांगून भाटकर म्हणाल्या, की स्त्रिया अधिकारावर आल्या, भ्रष्टाचाराचे प्रमाण तर कमी होते, असे अनुभवास आले आहे. तसेच न्यायदान क्षेत्रातही स्त्रियांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. स्वाधारच्या अध्यक्षा सरिता भट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा सुनंदा टिल्लू यांनी अनुभव सांगितले. कायद्याच्या नवीन पुस्तक संचाविषयीही त्यांनी माहिती दिली. स्वाधारच्या संजीवनी हिंगणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
न्यायदानात महिलांचा सहभाग वाढावा
By admin | Updated: March 22, 2017 03:28 IST