लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणगाव गणपती : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यवसायिकांच्या दुकानाची वेळ वाढवून देण्यात आली. या सोबतच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा आपली दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा रिटेल व्यापारी संघ संलग्न असलेल्या महागणपती व्यापारी संघटनेने रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी व्यापारी बांधवांसह मागणीचे निवेदन सरपंच सर्जेराव खेडकर व ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांचेकडे दिले आहे. यावेळी किरण शिंदे, ॲड. विकास कुटे, रवींद्र दौंडकर, सचिन कर्नावट, नीलेश साळुंके, ठाकूर देवासी, राहुल शेलार, अभिषेक शेळके, मनोज खेडकर, प्रवीण पाचुंदकर, महावीर चोरडिया, दिलीप कटारिया आदी पस्थित होते. स्थानिक सर्व वयोगटातील व्यापारी वर्गाचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. जवळपास सव्वा ते दीड वर्षे कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त असलेले इतर व्यावसायिकांची दुकाने जवळपास ६ ते ८ महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, अशा दुकानदारांना फार मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. काही काही छोट्या व्यावसायिंकावर तर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद आहेत. मात्र, वीजबिल कामगारांचे पगार, दुकान भाडे, नाशवंत व खराब झालेल्या मालाचे नुकसान, बँका, पतसंस्थांकडील कर्जाचे थकलेले हप्ते त्यामुळे व विनाकारण भरावा लागणारा व्याजाचा भुर्दंड यांसारख्या अनेक कारणांमुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असल्याने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधिन राहून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचा वेळ वाढवून सायंकाळी ५ वाजेपर्यंत करावा व इतर व्यावसायिकांनाही आपली दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फोटो:रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायतीला मागणीचे निवेदन देताना व्यापारी वर्ग.