सासवड : शासनाने नुकतेच पुरंदर तालुक्यातील २६ गावांचा समावेश दुष्काळसदृश गाव म्हणून जाहीर केला आहे. या गावांची यादीही प्रसारित झाली आहे. ही सर्व गावे पुरंदरच्या दक्षिण भागातील आहेत. मात्र, पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात यंदा खरीप हंगामात पाऊसच झाला नाही. संपूर्ण हंगाम वाया गेला आहे.रब्बी हंगामातही अनेक गावांना अद्यापही पाऊस झाला नसतानाही शासनाकडून या १८ गावांचा समावेश दुष्काळसदृश यादीत झाला नाही. त्या गावांचा समावेश टंचाईच्या यादीत करावा, अशी मागणी पुरंदर-हवेली युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. पुरंदरच्या पूर्व भागातील वाघापूर, शिवरी, गुऱ्होळी, पिसर्वे, नायगाव, राजुरी, रिसे - पिसे, माळशिरस, पोंढे, पारगाव, आंबळे, खळद, खानवडी, टेकवडी, राजेवाडी, वाल्हे, गुळुंचे या गावांत सध्या टंचाईची परिस्थिती असून, शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून या गावांचा दुष्काळसदृश यादीत समावेश करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी युवक काँग्रेसचे कैलास धिवार, माऊली यादव, तुषार ढुमे, मोबीन बागवान, सचिन जाधव, अमित कदम यांसह विविध गावचे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
१८ गावांचा टंचाईसदृश यादीत समावेश करावा
By admin | Updated: October 28, 2015 01:13 IST