पुणे : आजकाल पावसाच्या अनियमिततेबाबत ओरड केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून जिरवल्यास आणि संवर्धन केल्यास दररोज जलउत्सव साजरा करता येईल. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून नदी, विहिरी, नाले यांचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. लोकांसह सरकार, प्रशासन, राजकीय व्यक्ती यांची वृत्ती बदलल्यास आणि सजगता निर्माण झाल्यास पाण्याशी संबंधित सर्व समस्या सुटतील, असे मत वॉटर लिटरसी फाउंडेशनचे संस्थापक अयप्पा मसगी यांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी वसुंधरा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अयप्पा मसगी यांना वसुंधरा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, माधव चंद्रचूड, वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.प्लॅस्टिकमुक्त दापोलीसाठी कार्यरत असलेले रामदास कोकरे, चित्रपट निर्माते सुबय्या नलामुत्थु आणि सीडब्लूपीआरएस संस्थेसाठी डॉ. एम. के. सिन्हा यांना वसुंधरामित्र, सांगलीतील अग्रणी नदी पुनरु ज्जीवन प्रकल्पासाठी सुनील जोशी, नरेंद्र चुग, लातूरमधील मांजरा प्रकल्पासाठी अशोक कोकरे आणि पुण्यातील रामनदी प्रकल्पांसाठी इंदू गुप्ता, प्रगती कौशिक, अनिल गायकवाड यांना वसुंधरागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राजेंद्रसिंह म्हणाले, ‘‘नद्यांबाबत प्रत्येकाला आत्मीयता वाटली तरच त्यांचे पुनरु ज्जीवन खऱ्या अर्थाने होईल. नद्यांची स्वच्छता आणि सौंदर्य जपण्यासाठी होणाऱ्या प्रकल्पांना नदीसंवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा पाठिंबा आहे. मात्र, ते काम योग्य रीतीने होणे आवश्यक आहे.’’इंदू गुप्ता म्हणाल्या, ‘‘पुण्यातील राम नदीला २०१० मध्ये पूर आला. त्यानंतर नदीने जणू मदतीची हाक दिली. या नदीला महापालिका आणि जिल्हाधिकारी असे दोन पालक आहेत. नदीची स्वच्छता आणि ती पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एप्रिल २०११ मध्ये उपोषण केले. फेब्रुवारी २०१४ मध्ये राडारोडा टाकून नदीपात्र बुजवण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांनी सुरू केला. त्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण नाल्याचे नदीत रूपांतर करण्यात आम्हाला यश आले. १७ बांधकाम व्यावसायिकांविरोधात आमचा लढा सुरू आहे.’’ रामदास कोकरे म्हणाले, ‘‘कचरामुक्त शहर शक्य आहे. त्यासाठी जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. ’’ सुनील जोशी म्हणाले, ‘‘लोकसहभाग आणि समाज, सरकार यांच्या सहकार्यातून अग्रणी नदीला पुनरुज्जीवित करण्यात आले.’’
वृत्ती बदलल्यास पाणीप्रश्न कायमचा सुटेल
By admin | Updated: January 12, 2017 03:03 IST