नीरा : किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता व लहान मुलांचे आरोग्य व आहारावर लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे. कुपोषण ही मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी सकस आहाराबरोबरच स्वच्छतेवरही भर दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. समीक्षा कांबळे यांनी केले.
गुळुंचे-कर्नलवाडी (ता.पुरंदर) येथे राष्ट्रीय पोषण महामेळाव्याचे आयोजन १ ते ३० सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे. अभियानाच्या शुभारंभावेळी गुळुंचे प्रथम आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे बोलत होत्या. गुळुंचे येथे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच चंदा दशरथ निगडे व कर्नलवाडी येथे सरपंच सुधीर निगडे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा मातांना आमंत्रित करण्यात आले होते. दररोजच्या आहारात कोणते अन्नपदार्थ नियमित असावेत त्यांची प्रात्यक्षिके करण्यात आली होती.
उपस्थित महिलांना आहार, आरोग्य, वजनवाढीविषयी मार्गदर्शन केले. कोरोना व इतर होणारे आजार याविषयीही डॉ. समीक्षा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका वनिशा गायकवाड, शोभा निगडे, मुमताज अमिनगड, सुवर्णा भोसले, छाया रासकर, सरिता गायकवाड, लालूबाई निगडे, मदतनीस नंदा गायकवाड, सरस्वती पाटोळे, पुष्प कर्नवर, निमा कदम, रूपाली निगडे यांनी केले. आशा सेविका मीना निगडे व मनीषा निगडे यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक घेऊन स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिशा गायकवाड यांनी केले. आभार सरिता गायकवाड यांनी मानले.
०५ नीरा
गुळुंचे येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण महामेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. समीक्षा कांबळे.