पुणे : पत्नीचे शिर धडावेगळे करून तिचा खून करणाऱ्या पतीने जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी फेटाळला आहे. गोकुळ प्रताप चव्हाण (वय २८, रा. मूळडोंगरी, ता. नांंदगाव, जि. नाशिक, सध्या रा. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. मुंढवा येथे दि. ५ फेब्रुवारीला हा खून झाला होता. गोकुळ याने पत्नी शालुबाई (वय २६) यांचे शिर धडावेगळे केले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने पत्नीचे धड मुंढवा येथील एका विहिरीत तर शिर एका पडीक जमिनीवर टाकले होते. सुरुवातीला या महिलेची ओळख पटली नव्हती. परंतु, मनमाड पोलीस ठाण्यात महिलेच्या बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल झाली होती. त्या महिलेचे वर्णन आणि मृत महिलेचे वर्णन सारखेच असल्याने हा मृतदेह शालूबाई यांचा असल्याची खात्री पटली. त्याआधारे पोलिसांनी तिच्या नातेवाइकांकडे तपास केला तसेच पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला होता. त्याने पत्नीला दौंडमधून हडपसर येथे आणून तिचा खून केला. तसेच पत्नीची बेपत्ता असल्याची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दिली होती. या खूनप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्यानंतर प्रथम पोलीस कोठडी व नंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. नुकताच त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. गोकुळला जामीन दिल्यास तो फरार होण्याची दाट शक्यता असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. (प्रतिनिधी)
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीचा जामीन फेटाळला
By admin | Updated: October 28, 2015 23:57 IST