पुणे : इंदापूर, दौंडसाठी जादाचे पाणी सोडताना शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात शहराच्या विविध भागांत पाणीकपातीमध्ये वाढ झाल्याचे अनुभव नागरिकांना येत आहेत. या पाणीकपातीमधील छुप्या वाढीमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.यंदा सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यापासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत केली आहे. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आग्रहाखातर पुणेकरांनी बचत केलेल्या पाण्यातून दौंड, इंदापूरसाठी वाढीव पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांना आणखी वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. ती भीती खरी होताना दिसून येत आहे.कोथरूड तसेच शहरातील पेठांमध्ये पाणी खूपच कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाणीकपातीमध्ये वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचा समज नागरिकांचा होत आहे, तरी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी याची चौकशी करून खुलासा करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.पाणी सोडण्याच्या वेळा व पाण्याचा दाब कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्याचबरोबर विद्युतविषयक कामे करायची असल्याचे सांगून आठवड्यातून एक -दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण पालिकेकडून स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागणार आहेत.सप्टेंबर महिन्यापासून 30%पाण्यात कपात पुणेकरांनी बचत केलेल्या पाण्यातून दौंड, इंदापूरसाठी वाढीव पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांना आणखी वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
पाणीकपातीत छुपी वाढ; नागरिक त्रस्त
By admin | Updated: May 24, 2016 06:19 IST