शेलपिंपळगाव : याच पद्धतीची भावना उरी ठेवून आपली आषाढी पायी वारी पंढरीच्या विठुचरणी समर्पित करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक भक्तांच्या मेळाव्याने ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात पंढरीच्या विठोबाकडे प्रस्थान ठेवले आणि अवघ्या काही तासांतच अलंकापुरी वारकऱ्यांविना सुनी सुनी झाली. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या १८५व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यानिमित्त गेल्या चार-पाच दिवसांपासून अलंकापुरीत वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. संपूर्ण आळंदीत भाविकांचा ओघ दिसून येत होता. जमलेल्या वैष्णवांचा अलंकापुरीत टाळ-मृदंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’चा जयघोष सुरू होता. मात्र, माऊलींची पालखी शुक्रवारी सकाळी पुण्यनगरीकडे मार्गस्थ झाली आणि मागील तीन-चार दिवसांपासून वारकऱ्यांचा सुरू असलेला गजर मावळला. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास माऊलींच्या विधिवत पूजेनंतर तसेच शितोळे सरकारांच्या मानपानानंतर मानाच्या अश्वांचे आजोळघरी आगमन झाले. अश्वांना मानपान देऊन माऊलींची पालखी आजोळघरातून ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या साह्याने सजविलेल्या हायटेक रथात विराजमान करून सोहळ्याने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. या वेळी जमलेल्या जनसमुदायाने आकाशाकडे दोन्ही हात वर करून ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय’ असा मोठा जयघोष केला.सकाळी नऊच्या सुमारास वाजत-गाजत साईमंदिरापासून पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गजबजलेली अलंकापुरीत काही तासांतच शुकशुकाट झाला होता. (वार्ताहर)
अलंकापुरी सुनी सुनी...
By admin | Updated: July 11, 2015 04:13 IST