रहाटणी : सध्या महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, उमेदवारीअर्ज भरण्यास २७ तारखेपासून सुरुवात झाली आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने अर्ज आॅनलाइन भरण्याची सक्ती केल्याने अनेक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ज भरताना संबंधित संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन होत असल्याने काही वेळा प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत काही इच्छुक उमेदवारांनी बोलून दाखवीत आहेत. मात्र, उमेदवारीअर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस राहिल्याने अनेक उमेदवार तासन्तास संगणकासमोर बसून असल्याचे दिसून येत आहे. अद्याप प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली गेलेली नाही. यामुळे अनेक इच्छुक उमेदवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३ फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्याने काय करावे ते समजत नाही. आॅनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट कॉपी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे. मात्र, अनेक वेळा निवडणूक आयोगाचे हे संकेतस्थळाची वेगमर्यादा मंदावत असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मात्र इच्छुकांचा नाईलाज असल्याने तासन्तास संगणकाच्या समोर बसून अर्ज भरून घ्यावे लागत आहे. इच्छुकांच्या मागे सध्या पक्षाची उमेदवारी मिळविण्याची घाई आहे. त्यात अनेक प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र जमा करण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे.(प्रतिनिधी)
आॅनलाइनची इच्छुकांना डोकेदुखी
By admin | Updated: February 1, 2017 04:47 IST