केडगाव : खोपोडी (ता. दौंड) येथे सायंकाळी ७.३० च्या सुमारास गारपीट झाली. याचा तडखा खोपोडीसह, गांढळवाडी, हंडाळवाडी, केडगाव व दापोडीचा काही भाग, दौंडच्या पश्चिम भागात पाटेठाण या गावांना बसला. गांढळवाडीची यात्रा असल्याने भाविकांची तारांबळ उडाली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, ऊस, मका, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिसरातील गुऱ्हाळे बंद होती. राहू बेट परिसर, केडगाव परिसराला पावसाने झोडपल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. राहू बेट परिसरात पिलाणवाडी येथे मुसळधार पाऊस झाला. चौफुला परिसरातील वीटभट्टी व्यवसाय करणारे व्यावसायिकांचे गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय तालुक्यातील पोल्ट्रीधारक व गुऱ्हाळमालकांना या पावसाचा फटका बसला असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी तालुक्यातील तडाखा बसणाऱ्या गावातील पिकांचे शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खोपोडीचे माजी सरपंच दशरथ गरदडे यांनी केली आहे. मांडवगण फराटा : शिरुर तालुक्यातील पूर्व भागातील मांडवगण फराटा,वडगाव रासाई, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी, गणेगाव, बाभुळसर बुद्रुक, कोळगाव डोळस, भीमानदीकाठच्या विठ्ठलवाडी, टाकळीभीमा, सांगवी सांडस, न्हावी सांडस, पिंपरी सांडस, पाटेठाण आदी गावांच्या बागायती पट्ट्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. ऊस जनावरांचा चारा भुईसपाट झाला होता. वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात ८ व ९ तारखेला सलग पडलेल्या पावसामुळे याचे नुकसान होऊनही अद्याप कसलेही पंचनामे झालेले नाहीत. लवकरात लवकर पंचनामे करावेत, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
खोपोेडीला गारांचा पाऊस
By admin | Updated: March 14, 2015 06:16 IST