पुरुषोत्तम प्रकाश बेहरा हे २४ मे २०२१ रोजी पुणे-नगर रोडने जात असताना कोरेगाव भीमा येथे ग्रीन गार्डन हॉटेलजवळ आले असताना त्यांच्या पाठीमागून एका अज्ञात इसमाने मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला होता. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक करीत होते. तपासामध्ये त्यांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजही मिळालेले होते. त्यावरून सदर सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी हा पुणे शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार फिदा हुसेन मनुआली इराणी (रा. पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) हाच असल्याची माहिती समजली होती. त्याचेकडे असलेल्या करडे रंगाचे मोटार सायकल (एमएच १२ एससी ३६८२ )चा वापर करून रोडने जाणारे येणारे लोकांची लूटमार करतो, अशी माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे-नगर रोडने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदर नंबरची दुचाकी पुणे-नगर रोडने जात असल्याची माहिती मिळाल्यावरून तिचा पाठलाग करून कोरेगाव भीमा येथे अडवून त्यावरील इसम फिदा हुसेन मनुआली इराणी यास ताब्यात घेतले. त्याने एकूण ५ ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून, त्याचेवर यापूर्वी पुणे शहर येथे १८, हैद्राबाद (तेलंगणा) येथे ११ व गोवा येथे २ असे चैन, मोबाईल स्नॅचिंगचे एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सुभाष राऊत, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरू गायकवाड, मंगेश थिगळे, गुरू जाधव, अक्षय नवले, काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.
अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST