शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ज्ञानपर्वाचा अस्त (मंथन लेख२)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. कल्याण काळे यांचे नुकतेच वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. कल्याण काळे यांचे नुकतेच वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक ज्ञानयज्ञ शांत झाला. त्यांच्या सुहृदाने त्यांना वाहिलेली ही आदरांजली...

--------------

- डॉ. विनायक गंधे

डॉ. कल्याण काळे ‘चालता बोलता ज्ञानकोश’ होते. क्रियावान पंडित होते. प्रसिद्धीच्या झोतात न येता शांतपणे आणि निष्ठेने अर्धशतकाहूनही अधिक काळ ते आपले ज्ञानदानाचे आणि लेखनाचे काम करत राहिले. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्यासकांना डॉ. काळे सुपरिचित आहेत. बालपणापासून अधू दृष्टी असूनही प्राचीन साहित्याच्या संशोधनाचे त्यांनी अत्यंत जिकिरीने केलेले काम थक्क करणारे आहे.

एखाद्या शब्दाचा अर्थ, त्याची व्युत्पत्ती, एखादी वाङ्मयीन संकल्पना किंवा सिद्धान्त याबाबत कोणतीही शंका केव्हाही डॉ. काळे यांना विचारावी; या शंकेचे किंवा प्रश्नाचे काळे सरांकडून तत्काळ निवारण व्हायचे. साहित्याच्या विद्यार्थ्यांना डॉ. काळे सरांचे घर मुक्तद्वार होते. भाषाविज्ञान आणि प्राचीन मराठी साहित्य या विषयांवर त्यांनी मौलिक ग्रंथलेखन केले. मराठीबरोबरच संस्कृत भाषेचेही एम.ए. असल्यामुळे त्यांच्या विचारांना संस्कृत साहित्याची व साहित्यशास्त्राची व्यापक बैठक होती. इंग्रजी साहित्याच्या अभ्यासातून त्यांनी आधुनिक भाषाविज्ञान मराठीत आणले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधुनिक भाषाविज्ञानाचा परिचय करून देण्याचे महत्त्वाचे कार्य ज्या मोजक्या अभ्यासकांनी केले, त्यात डॉ. काळे यांचे महत्त्वाचे स्थान आहे. साहित्याच्या अभ्यासातील भाषेचे महत्त्व डॉ. काळे यांनी प्रस्थापित केले.

त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी अमराठी विद्यार्थ्यांना दहा वर्षे अध्यापन केले. परदेशी विद्यार्थ्यांबरोबर भारतभ्रमण करून डॉ. काळे यांनी त्यांना भारतीय संस्कृतीचा परिचय करून दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेत डॉ. काळे यांनी डॉ. अंजली सोमण यांच्या सहकार्याने अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याचे वर्ग घेतले. यातूनच त्यांचे ‘लर्निंग मराठी थ्रू इंग्लिश’ हे मौलिक पुस्तक तयार झाले. व्यावहारिक मराठी या अभ्यासक्रमावर डॉ. काळे व डॉ. द. दि. पुंडे यांनी पुस्तक लिहिले. आजही ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते.

मराठी अभ्यास परिषद चालवीत असलेल्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचे ते ९ वर्षे संपादक होते. या काळात डॉ. अशोक केळकर, प्रा. प्र. ना. परांजपे, डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने डॉ. काळे यांनी भाषाविषयक अनेक उपक्रम केले. ‘वेदान्त’ विचारांवर त्यांनी मौलिक लेखन केले. त्यासाठी ‘तंजावर’ येथील सरस्वती महालातील प्राचीन हस्तलिखितांचा अभ्यास केला. तसेच उत्तर कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, गाणगापूर या ठिकाणी जाऊन डॉ. काळे यांनी तेथील धार्मिक संप्रदायाचा अभ्यास केला. समर्थ रामदास आणि परांड्याचे हंसराज स्वामी यांच्या अद्वैती तत्त्वज्ञानाचे सांगोपांग विवेचन त्यांनी अनेक ग्रंथांतून आणि लेखनातून केले. हंसराजस्वामींचे १४ ग्रंथ संशोधित आणि संपादित करून डॉ. काळे यांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत डॉ. काळे कार्यरत होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी हंसराजस्वामींचा ‘तत्त्वझाडा’ हा ग्रंथ संपादित करून अभ्यासकांना उपकृत करून ठेवले.

राज्य शासनाच्या अभिजात मराठी भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य होते. मराठी भाषेला अभिजात (क्लासिक) भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना राज्यशासनाचा डॉ. अशोक केळकर पुरस्कार मिळाला. मसापचा डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार मिळाला. डॉ. व. दि. कुलकर्णी स्मृती पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. काळे यांनी या पुरस्कारांचा स्थितप्रज्ञतेने स्वीकार केला. अविचल निष्ठेने त्यांचे लेखनकार्य चालूच ठेवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली. डॉ. काळे यांनी स्वागतशील मनाने साहित्यव्यवहार पाहिला. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे रामदासांचे वचन प्रमाण मानून त्यांनी लेखन केले. त्यातून तत्त्वार्थ सांगितला. त्यांनी दिलेले समृद्ध विचारधन हा अभ्यासकांचा अमूल्य ठेवा आहे.

-------------