पुणे : पुणे जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचे उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात होत आहे़ या ग्रामपंचायतींसाठी ४ आॅगस्टला मतदान होणार आहे़ यामुळे आता ग्रामपंचायतीचा फड रंगण्यास सुरुवात झाली आहे़ या ग्रामपंचायतींच्या बरोबरच १९६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे़ राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या़ परंतु सहा महिने अगोदरच निवडणुका घेण्यास विरोध झाल्याने तेव्हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता़ त्यानंतर २३ जूनला नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता़ आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या़ या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १३ ते २० जुलै अशी असून, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत़ या अर्जांची छाननी २१ जुलै रोजी होणार आहे़ २३ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत माघारी घेण्याची मुदत आहे़ त्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे़
जिल्ह्यात रंगणार ग्रामपंचायतींचा फड
By admin | Updated: July 13, 2015 03:50 IST