शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीचे २९ कर्मचारी पगार कमी करण्यात आल्याने बेमुदत संपावर गेल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून आज सोमवार (दि. ५ एप्रिल) पासून मागण्या मान्य होईपर्यंत या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
याबाबतचे लेखी सह्यांचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शिरूरचे गटविकास अधिकारी व तळेगाव ढमढेरेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यानंतर सरपंच,उपसरपंच यांमध्ये मध्ये बदल झाला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळेल अशी अपेक्षा असताना तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतने मात्र दोन महिने पगार थकविले व त्यानंतर चक्क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केल्याचा प्रकार घडला आहे.एकीकडे कोरोना काळामध्ये जीवाची बाजी लावून काम करत असल्याने वेतन वाढ होण्याची अपेक्षा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागलेली असताना देखील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत मध्ये मात्र हा अनोखा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर,मास्क दिले जात नसून दोन महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही.तसेच सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आले, त्यामुळे संतापलेल्या तब्बल एकोणतीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा मार्ग अवलंबला असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर आज सोमवार (दि. ५ एप्रिल) रोजी याबाबतचे निवेदन तळेगाव ढमढेरेचे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर तसेच शिरूरच्या गटविकास अधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. हे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी कुमार ढमढेरे, प्रवीण आल्हाट, हनुमंत आल्हाट यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सह्यांसाह दिले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली आल्हाट, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये गेल्या चार वर्षापासून कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी भरला नाही, विमा पॉलिसी मेडिकल पॉलिसी भरली नाही,सरपंच व ग्रामविकास अधिकारी कर्मचाऱ्यांचे शोषण करत असून खालच्या दर्जाची वागणूक देत असल्याचे आरोप ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिलेल्या निवेदनात केले आहेत.यासंदर्भात तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.तर शिरूरचे गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले असून याबाबत सदर ग्रामविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ग्रामविकास अधिकारी उद्या कागदपत्रे घेऊन येणार आहेत. त्यानंतर तातडीने सदर कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी सांगितले.
.तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीला उत्पन्न कमी असल्याने व कर्मचाऱ्यांच्या पगारावर बराचसा खर्च होत असल्याने काही प्रमाणात कर्मचाऱ्यांचा पगार कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.
नवनाथ ढमढेरे,उपसरपंच, ग्रामपंचायत, तळेगाव ढमढेरे
तळेगाव ढमढेरे येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना संपाबाबतचे निवेदन देताना ग्रामपंचायत कर्मचारी.