नीरा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी नीरा पोलीस दूरक्षेत्रात विविध पक्ष, संघटना व उमेदवारांची बैठक पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी बोलवली होती. त्यावेळी महाडीक बोलत होते. यावेळी माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, दीपक काकडे, विजय शिंदे, अनिल चव्हाण, गणपत लकडे, नाना जोशी, प्रमोद काकडे, दयानंद चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, हवालदार सुरेश गायकवाड, सुदर्शन होळकर, नीलेश जाधव यांसह पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.
महाडीक म्हणाले, नीरा ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. यागावातील ज्या व्यक्तींवर गुन्हे नोंद आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधीत कारवाई करत आहोत. तसेच काही लोकांची तडीपारीची ही कारवाई करत आहोत. निवडणूक काळात तक्रार असल्यास ती तत्काळ दाखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. याकाळात पोस्टर, बॅनरवर प्रकाशकाचे नाव व मोबाईल नंबर असावा. बॅनर तयार करणाराचे नावही छोट्या अक्षर असावे. व्हाॅट्सअॅप मेसेज या काळात खूप मोठ्या प्रमाणात पसरतात, अफवा पसरतात, बदनामी केली जाते. याकाळात चुकीचा मेसेज कोणी फाॅरवर्ड केला तर जसा बनवणारा दोषी आहे, तसेच तो फाॅरवर्ड करणाराही दोषी धरण्यात येईल. त्यासाठी जनतेनेसुद्धा आपण कोणता मेसेज ग्रुपमध्ये टाकतो, फाॅरवर्ड केला जातो; याची काळजी घ्यावी. निवडणूक काळात आचारसंहितेच्या भंगाच्या प्रकरणी गुन्हा निश्चितपणे दाखल केला जाईल. सर्वांनी ही निवडणूक शांतताप्रिय वातावरणात व चांगल्या प्रकारे पार पडण्याकरिता प्रयत्न करावे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांनी स्वागत करून मार्गदर्शन केले. नीरा विकास आघाडीचे प्रमुख राजेश काकडे व चव्हाण पॅनेलचे प्रमुख दत्ताजीराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केल. हवालदार सुरेश गायकवाड यांनी आभार मानले.
चौकट
निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्याही प्रकारचा जल्लोष होणार नाही. याकाळात डीजे बंदी असणार आहे. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर गुलाल उधळणे, फटाके फोडणे, घोषणाबाजी करणे असे गैरप्रकार केल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.