पुणे : पुणे जिल्ह्यातील ज्या गावांची लोकसंख्या पाच हजारांवर आहे, त्या गावठाणाची हद्दवाढ करण्यास राज्यशासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता गावठाणाची निवासी हद्द ५०० मीटरऐवजी दीड किलोमीटरपर्यंत होणार आहे. मात्र, याबाबत लेखी आदेश जिल्हा प्रशासनास मिळालेला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटांमधील गावांमध्ये ही हद्द २०० मीटरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. प्रामुख्याने मावळ आणि मुळशी भागातील ही गावे आहेत. याबाबत हवेली तालुका काँग्रेसचे नेते नरेंद्र मते यांनी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे मागणी केली होती. पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक योजना १९९७ ( आरपी) नुसार, पाच हजारांच्या आत लोकसंख्या असलेल्या गावांच्या गावठाणाची हद्द २००, तर पाच हजार लोकसंख्येवरील गावांसाठी ५०० मीटरपर्यंत ठरविण्यात आली होती. त्यासाठी १९९१ च्या लोकसंख्येचा निकष ग्राह्य धरला होता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये गावांची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक झाली. परंतु, १९९१ च्या अटीमुळे गावठाणाची हद्द मर्यादित राहिल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. अखेर १९९१ च्या लोकसंख्येचा निकष रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यावर हरकती आणि सूचनाही झालेल्या होत्या. त्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)त्यामुळे या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर शासनाने ही हद्दवाढ १५०० मीटर पर्यंत करावी अशी प्रमुख हरकत अनेक गावांकडून घेण्यात आली होती. मात्र, राज्यशासनाने 500 मीटर पर्यंतचा निर्णय घेतल्याने अनेक गावांमधील राजकीय पदाधिका-यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने महापालिका हददीजवळील गावांचा यात समावेश आहे.
गावांची सरकारी वेस वाढणार
By admin | Updated: September 30, 2015 00:58 IST