लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सांस्कृतिक कार्यक्रम बघून घरी जात असताना ज्येष्ठ नागरिकाला दोघाजणांनी गंडवत त्यांची सोन्याची अंगठी आणि ३०० रुपयांची रोकड लंपास केली. हातामध्ये अंगठी ठेवू नका, असे सांगत ही अंगठी हातचलाखी करून लांबवण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास स्वारगेटजवळ घडली. नंदकुमार घुबे (वय ६३, रा. प्रियदर्शनी सोसायटी, दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घुबे हे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोरून जात होते. तेथे उभ्या असलेल्या दोघांनी घुबे यांना अडवले. त्यांना पोलीस असल्याची बतावणी करीत अंगठी हातात घालून ठेवू नका, असे सांगितले. ही अंगठी पाकिटात ठेवून देण्याच्या बहाण्याने घेऊन शंभर रुपयांच्या नोटेमध्ये गुंडाळून ठेवण्याचा बहाणा करीत हातचलाखी करून ऐवज लंपास केला.
हातचलाखीने लांबवली सोन्याची अंगठी
By admin | Updated: July 17, 2017 04:16 IST