हडपसर : हडपसर उपनगराला मोठमोठी पदे मिळूनही १० लाख लोकसंख्या असलेल्या या विधानसभा मतदारसंघात अद्ययावत क्रीडांगण बनविण्यात राजकारण्यांना यश आलेले नाही. हडपसरकर खेळाडूंच्या दृष्टीने ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे खेळाडू गाडीतळ येथील केंद्र शासनाच्या ग्लायडिंंग सेंटरच्या मैदानात खेळतात.स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, महापौर, आमदार, खासदारकी यांच्यासह राज्यमंत्रिपद हडपसर परिसरातील राज्यकर्त्यांनी मिळाले. शेतकरी व व्यापाऱ्यांचा परिसर म्हणून परिचित असलेल्या हडपसरची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी पार्कमुळे खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली आहे. जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरही खेळणारे खेळाडू या परिसरातून निर्माण झाले. परंतु, आजतागायत प्रशासन तसेच राज्यकर्त्यांना खेळाडूकरिता प्रशस्त, अद्ययावत क्रीडांगण बनविता आलेले नाही. परिसरातील शाळा, महाविद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात साधना मुलांचे विद्यालय व बंटर हायस्कूलचे मैदान वगळता महापालिकेचे एक मैदान हडपसर उपनगरात नाही. एखादे क्रीडांगण व्हावे, याकरिता कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतलेला नाही. हौशी खेळाडू गाडीतळ येथील केंद्र शासनाच्या ग्लायडिंंग सेंटरच्या मैदानात खेळतात; मात्र तेथेही त्यांना मज्जाव केला जातो. ग्लायडिंंग सेंटरचे प्रशस्त मैदान केंद्र सरकारच्या माध्यमातून वापरात नाही. त्यातील काही भागच प्रशिक्षण व संशोधनाकरिता वापरला जातो. (वार्ताहर)
ग्लायडिंग सेंटर; पण वापर खेळासाठी
By admin | Updated: January 12, 2017 03:11 IST