एजंटगिरीला चाप : वाहनधारकांच्या वेळेची बचत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याच्या परिवहन विभागाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. यात लर्निंग लायसन्ससाठी (शिकाऊ परवाना) आरटीओ कार्यालयात न जावे लागणे आणि वाहन वितरकांकडे वाहनांची नोंदणी करणे याचा समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे वाहनधारकांच्या वेळेत बचत होणार आहे. शिवाय लर्निंग लायसन्स घरातून काढणे शक्य झाल्याने आरटीओतील एजंटगिरीला काहीअंशी चाप बसणार आहे.
बॉक्स १
असा करा ऑनलाईन अर्ज :
Parivahan.Gov.in या वेबसाईटवर गेल्यावर सारथी हा पर्याय निवडणे. यात ड्रायव्हिंग लायसन हा पर्याय निवडणे. नंतर लर्नर अप्लिकेशन निवडणे. यात अर्ज भरणे. यात देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकवर ओटीपी येईल. तो भरल्यावर फी भरल्यावर टेस्टसाठीचा व्हिडिओ दिसेल. ती टेस्ट १५ गुणांची असेल. पैकी ९ गुण मिळाल्यानंतर लर्निंग लायसन्स टेस्ट उत्तीर्ण झाल्याचा मेसेज येईल. मग तिथे प्रिंट नावाचा पर्याय निवडल्यावर लायसन्सची प्रिंट निघेल. तेच लायसन्स असेल.
बॉक्स 2
तर जावे लागेल आरटीओला :
लर्निंग लायसन्ससाठी दोन पर्याय आहेत. एक घरी बसून लायसन्स काढणे आणि दुसरे आरटीओ कार्यालयात येऊन काढणे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा ज्यांना आरटीओ कार्यालयातच येऊन लर्निंग लायसन्स काढायचे आहे. अशांना आरटीओ कार्यालयात येऊन लर्निंग लायसन्स काढता येणार आहे. घरी बसून केवळ लर्निंग लायसन्स काढता येणार आहे. पक्क्या लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात येणे क्रमप्राप्त आहे.
बॉक्स ३
नवीन वाहनांची नोंदणी वितरक करणार :
सोमवारपासून राज्यात दुचाकी व चारचाकी नव्या वाहनांची नोंदणी वाहन वितरकाकडे करण्यास सुरुवात झाली. असे नोंदणी करणारे पुणे शहर हे राज्यातील पहिले शहर ठरले. यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने आपल्या वाहन प्रणालीत आवश्यक तो बदल केला. नोंदणी करताना वाहनाच्या चेसीचा क्रमांक, वाहनाचा फोटोसह आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन सबमिट झाल्यावर वितरक लगेचच वाहनधारकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर वाहनाचा क्रमांक पाठविले जाते. ज्यांना व्हीआयपी क्रमांक हवा आहे. अशा वाहनधारकांना आरटीओ कार्यालयातूनच क्रमांक दिला जात आहे.
कोट :
परिवहन विभागाने वाहनधारकांसाठी नवी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे वाहनधारकांचा वेळ खूप वाचणार आहे. त्यांना आरटीओ कार्यालयात यावे लागणार नाही. वाहनधारकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा.
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे