पुणे : महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या आठवड्यात जुंपली होती. शासनाच्या सभा ऑनलाइन न घेता प्रत्यक्ष घेण्याबाबतच्या पत्रामुळे विरोधी पक्षाने आंदोलन केले होते. परंतु, मंगळवारी होणारी सभासुद्धा ऑनलाइनच होणार असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले. सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्याची परवानगी द्यावी, अशी वारंवार मागणी करुनही राज्य सरकारने याबाबत अद्यापही कोणत्याही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे मंगळवार आणि त्यापुढे होणाऱ्या सभा दृकश्राव्य माध्यमातून होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसाधारण सभा घेण्यास मनाई केलेली आहे. या सभा न झाल्याने ३०० पेक्षा अधिक विषय प्रलंबित आहेत. मागील आठवड्यात पालिका प्रशासनाने ८ फेब्रुवारीला ऑनलाइन सभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, पालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करीत प्रत्यक्ष मुख्य सभा घेण्यास मान्यता दिल्याचा दावा केला होता.
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्यास हरकत नाही, असे जे पत्र पाठविले होते, त्यावर केवळ ८ फेब्रुवारी २०२१ ला सर्वसाधारण सभा घेण्यास हरकत नाही, असा उल्लेख होता. पालिका आयुक्तांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये मिळकतकरात सुचविलेली वाढ स्थायी समितीने फेटाळली आहे. सर्वसाधारण सभेसमोर हा प्रस्ताव आणून तो २० फेब्रुवारीपूर्वी फेटाळण्याचा निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा आयुक्तांनी सुचविलेली करवाढ लागू होईल. यासाठी सर्वसाधारण सभा घेणे गरजेचे आहे. पुणेकरांच्या हितासाठी ऑनलाइन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले.