पुणे : मुलांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून मोटारसायकलवरून आलेल्या टोळक्याने आज रात्री बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर येथे धुडगूस घातला़ त्यात एका महिलेसह तिघे जण जखमी झाले असून, अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या़ अप्पर इंदिरानगर येथील शेवटच्या बसस्टॉपजवळ पवननगर येथे आज दुपारी मुलांमध्ये भांडणे झाली होती़ या कारणावरून रात्री दहाच्या सुमारास २५ ते ३० जण दुचाकींवरून आले़ त्यांनी तेथे असलेल्या लहान मुलांसह महिला, तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ घरांवर दगडफेक केली़ तेथे उभ्या असलेल्या ३ ते ४ रिक्षा, टेम्पोवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी वाहने ढकलून दिली़ बराच वेळ हा गोंधळ सुरू होता़ या टोळक्याने केलेल्या दगडफेकीत एक लहान मुलगा, महिला व तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले़ या घटनेने नागरिक प्रचंड संतप्त झाले होते़ याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले, की दुपारी मुलांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार झाला असून, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे़ (प्रतिनिधी)
अप्परमध्ये टोळक्यांचा धुडगूस
By admin | Updated: November 17, 2014 04:56 IST