पुणे : कुख्यात नीलेश घायवळ टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून शनिवारी जेरबंद केले. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. गणेश बबन धनवे (वय २३, रा. धनवेवाडी, पौड) असे अटक आरोपीचे नाव आहे. घायवळ टोळीचा सराईत गुन्हेगार संतोष धुमाळ हा धनवे याच्यासह आशिष गार्डन चौकात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी प्रशांत पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार, कर्मचारी प्रशांत पवार, सचिन अहिवळे, बबन बोऱ्हाडे, प्रमोद मगर, नागनाथ गवळी, चंद्रकांत सावंत, अनंत दळवी, हृषीकेश महल्ले यांनी आशिष गार्डन भागात सापळा लावण्यासाठी तयारी केली. परंतु पोलीस तिथे पोचण्याच्या आतच धुमाळ तेथून गेलेला होता. मात्र धनवे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या धनवेला पाठलाग करून जेरबंद करण्यात आले. धनवे आणि धुमाळ या दोघांनीही पौड गावातील भाजी मार्केटमध्ये आशुतोष पिंगळे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी आरोपींनी पिंगळेवर गोळ्या झाडल्या होत्या. (प्रतिनिधी)
घायवळ टोळीच्या गुंडाला अटक
By admin | Updated: October 27, 2014 03:16 IST