पुणे : विविध उपक्रम राबवून पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाला विधायकतेची जोड देणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या कामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन हे गणेश जलसंवर्धन अभियान राबविण्यात येणार असून, या व्यासपीठाखाली सर्व मंडळांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. खडकवासला धरणात गेल्या दीडशे वर्षांपासून साचलेला गाळ काढण्याचा उपक्रम कर्नल सुरेश पाटील यांनी सुरू केला आहे. यामध्ये आता गणेश मंडळांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांची फौजही सहभागी होणार आहे. २२ किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्याचे महाकाय काम २४ तारखेपासून सुरू केले जात आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,कर्नल सुरेश पाटील यांची ग्रीन थंब पर्यावरण संस्था यांनी एका कार्यालयात आज सायंकाळी मंडळांना आमंत्रित केले होते. पाटील यांनी प्रारंभी स्लाईड शोच्या माध्यमातून धरणातील गाळ, त्यामुळे घटलेला पाणीसाठा, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी, संभाव्य अराजक यांंचा ऊहापोह केला. ते म्हणाले, ‘‘धरण बांधले गेले त्या वेळी ४ टीएमसी साठवण क्षमता होती, आज ती गाळामुळे २ टीएमसीपर्यंत आली असून, काठापासून शंभर मीटरचे मातीचे बेट झाले आहे. एक ट्रक माती काढल्यास एक टॅँकर पाणी साठत असल्याने एक लाख ट्रक गाळ काढण्याचे आव्हान पेलले, तर शेतक-यांना व पुणेकरांना पाणी मिळून खूप मोठा पैसा वाचेल. सरकार याबाबत काहीही करीत नसल्याने लोकसहभाग आवश्यक आहे.४दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोक गोडसे व महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंंडळाचे अण्णा थोरात, साखळीपीर तालीम मंडळाचे रवींद्र माळवदकर, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, सहकार तरुण मंडळाचे भाऊ करपे आदींनी सहभागाबाबत विचार व्यक्त केले. थोरात म्हणाले, की संपन्न मंडळांनी याकामी आर्थिक मदत करावी, अन्य मंडळांनी श्रमदान करावे. सूर्यवंशी म्हणाले, की महाकाय गाळ काढण्यासाठी गणेश सेना काम करेल. हे देशात वेगळे काम ठरेल. सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.४माळवदकर म्हणाले, की सामुदायिक चळवळ म्हणून या कामात सरकारलाही सामावून घेऊ. करपे म्हणाले, की या चांगल्या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी मंडळांनी मिरवणुका, सजावट यांचा खर्च टाळून मदत केली पाहिजे. गोडसे यांनी या पुण्याच्या कामात गणेशोत्सवाच्या उत्साहानेच सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सेवा मित्र मंडळाचे शिरिष मोहिते, आदर्श मंडळाचे उदय जगताप यांच्यासह प्रताप परदेशी, भोला वांजळे, भाई कात्रे, हेमंंत रासने, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते. काही निवडक मंडळांच्या कार्यकर्यांची या कार्यक्रमानंतर बैठक झाली. विवेक खटावकर यांनी प्रास्तविक केले. सकारात्मक प्रतिसाद..!४माती काढलेल्या जागी वृक्षारोपण केल्यास घनदाट जंगल निर्माण होऊन पुढील अनेक पिढ्या आपल्या कामाचे नाव काढतील, असे सांगून पाटील यांनी आजवर याकामी आलेला सकारात्मक प्रतिसाद, अडथळे यांंचा ऊहापोह करून या कामात माजी सैनिक नियोजनाचे काम करणार असल्याचे नमूद केले.
गणेश मंडळे काढणार गाळ
By admin | Updated: May 21, 2015 01:39 IST