पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या गजेंद्र चौहान यांना हटविले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे स्पष्ट मत अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बुधवारी व्यक्त केले.गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या वादावरून विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाने शंभरी ओलांडली आहे तर विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाला १५ दिवस पूर्ण होत आहे. जवळपास पाच विद्यार्थ्यांना उपोषणामुळे रूग्णालयातही दाखल करण्यात आले आहे, तरीही असंवेदनशील शासनाने अद्याप आंदोलनावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचललेले नाही. या पार्श्वभूमीवर नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच पल्लवी जोशी यांनी एफटीआयआयमध्ये येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.पल्लवी जोशी म्हणाल्या, एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड केली आहे. त्यांची नियुक्ती रद्द केली तरच आंदोलनावर तोडगा निघेल. ही नियुक्ती रद्द झाली तर विद्यार्थीही थोडेसे नमते घेतील. बाकीच्या नियामक मंडळाच्या निवडीबद्दल पुढे निर्णय घेता येतील. चित्रपट क्षेत्रातील लोकांची कमिटी पाठवावी. विद्यार्थी एवढे दिवस आंदोलन करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांची कमिटी तयार करावी आणि ती विद्यार्थ्यांशी चर्चा करायला पाठवावी. सरकार चूक की बरोबर यापेक्षा सरकारने विद्यर्थ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. मी राजीनामा दिल्याने यापासून लाब्ां राहिले, पण असते तर नक्कीच शासनाशी बोलणी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता, असेही त्यांनी नमूद केले.मुलांनी पडती बाजू घ्यावी, असे मला वाटत नाही, उलट सरकारने पालकत्त्वाची जवाबदारी घेत विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे. शासनाने पडती बाजू घेतली तर, तो समंजसपणा ठरेल. आंदोलन मागे घेतले तर, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईल. विद्यार्थी उपोषणाला बसूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. ही कोंडी झाली आहे, ती फोडण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
गजेंद्र चौहान यांना हटविले; तरच तोडगा निघेल
By admin | Updated: September 24, 2015 03:05 IST