पुणे : झोपडपट्ट्यांखाली असलेल्या जमिनींवर झोपडपट्टीवासीयांची मालक म्हणून नोंद करावी व व अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी विकास आघाडीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरूष या मोर्चात सामील झाले होते.झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौकातून दुपारी निघालेल्या या मोर्चात दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि झोपडपट्टीवासीयांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. जोंधळे चौक, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, फडके हौद, दारूवाला पूल, रास्ते वाडा यामार्गे मोर्चा विभागीय आयुक्तालयावर गेला. विविध ११ मागण्यांबाबत घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्या वेळी वैराट म्हणाले, ‘‘सरकारी जागेवर असलेल्या झोपडपट्टीवासीयांची सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून नोंद करावी. विविध घरकुल योजनांमध्ये पाचशे चौरस फुटांचे घर दिले जावे. महार वतन हस्तांतरित केलेल्या जमिनी दलितांना परत दिल्या जाव्यात. इंदू मिलवरील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे, अॅट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन देऊ नये, आदिवासी जमातीमधील पारधी जातीला लागू सवलती यांचाही ऊहापोह वैराट यांनी केला. (प्रतिनिधी)
झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा
By admin | Updated: February 21, 2015 01:58 IST