- पांडुरंग मरगजे
धनकवडी : संयम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सराव न करता केवळ आत्मविश्वासाच्या बळावर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारोवर तिरंगा फडकावणारी पहिली भारतीय महिला विश्वविक्रमवीर गिर्यारोहक म्हणून धनकवडी येथील स्मिता घुगे हिने समस्त तरुणाईसमोर एक आदर्श ठेवला आहे. मात्र, सरकार- दरबारी दखल आणि आर्थिक पाठबळ न मिळाल्याने खचून जाऊन तिने अखेर आज मोठा निर्णय घेतला आहे. सात खंडांमधील सात सर्वोच्च शिखरं सर करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रवास आजपासून संपला असल्याची खंत व्यक्त करीत माझ्या स्वप्नांची होळी करत असल्याची तीव्र नाराजी स्मिताने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, याच दिवशी व्यथित झालेल्या स्मिता घुगे म्हणाल्या, ‘महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यापेक्षा माझ्यासारख्या ध्येयवेड्या महिलांच्या पाठीशी समाज उभा राहिला असता, तर आज हा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर आली नसती. शुभेच्छांपेक्षा जास्त गरज पाठिंबा आणि आर्थिक पाठबळाची आहे.गेल्या सहा महिन्यांपासून मी यासाठी धडपडत आहे. तीन शिखरं पादाक्रांत केली. राहिलेली चार शिखरं सर करण्यासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. मात्र, या मेहनतीला आर्थिक पाठबळ मिळाले नाही, शासकीय दरबारात कोणी दखल घेतली नाही, सामाजिक संस्था, राजकीय नेते शैक्षणिक संस्था उद्योग व्यवसायिकांनीदेखील हात झटकले.
चौकट जगाच्या लोकसंख्येत आपल्या देशाची लोकसंख्या १८ टक्के आहे. मात्र, ऑलिंपिकमध्ये पदकांची कमाई त्या मानाने नगण्य आहे. आपल्याकडे खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा केली जाते, गिर्यारोहकांकडून एव्हरेस्ट सर करण्या ची अपेक्षा केली जाते, परंतु सोयी-सुविधा, आर्थिक पाठबळ मिळत नाही. यात उपेक्षा केली जाते. एखादा खेळाडू किंवा गिर्यारोहक मेहनत व जिद्दीच्या बळावर सुवर्णपदक प्राप्त करतो किंवा सर्वोच्च शिखर पादाक्रांत करतो, तेव्हा सरकार अथवा प्रायोजक खेळाडूचा 'माग काढत येतात' आणि त्यांच्यावर 'बक्षिसांची खैरात' करतात. परंतु खेळाडूंना दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी गरज असते उत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र आणि उत्तम मार्गदर्शन आणि पाठबळाची, एखाद्या दुसऱ्या खेळाडूंवर बक्षिसांची 'खैरात' करण्यापेक्षा सर्वांसाठीच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, तर अशा पद्धतीने कोणालाही असा निर्णय घेण्याची वेळ येणार नाही.