पुणे : ‘एफटीआयआय’पाठोपाठ आता ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ (डाएट)च्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांच्या विरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. फेलोशिपबाबत फसवणूक झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष धगधगत आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.विद्यार्थ्यांना एमचआरडीच्या नॉर्मनुसार फेलोशिप देण्याऐवजी डीआरडीओच्या जुन्या नियमानुसार देऊन त्यांची एकप्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संस्थेच्या निर्णयात बदल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. आपल्या हक्काची फेलोशिप मिळवण्यासाठी आम्ही गेल्या चार दिवसांपासून उन्हातान्हात उभे राहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. दि. २१ रोजी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी फेलोशिपबाबत विचारणा केली असता, रकमेत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठांकडून झालेल्या कार्यालयीन चुकीमुळे फेलोशिपचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे, अशी सारसासारव कुलगुरूंकडून करण्यात आली. मात्र, विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. व्यवस्थापनाच्या चुकीमुळे त्यांचा अभ्यासक्रम मागे पडत आहे, वेळ आणि शक्ती खर्च होत आहे. मात्र, डाएटच्या प्रशासनाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. प्रशासनाने त्वरित तोेडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करावे लागेल आणि बिघडत्या अवस्थेला प्रशासन कारणीभूत असेल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
चौथ्या दिवशीही डाएटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू
By admin | Updated: September 24, 2015 03:11 IST