पुणे : काँग्रेसचे उमेदवार व उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष व राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब बोडके, मनसेमधून शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेले नगरसेवक राजू पवार या तीन विद्यमानांसह खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र व भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे अशा तगड्या चारही उमेदवारांमुळे प्रभाग क्रमांक १४ -डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनीमधील लढत रंगतदार होऊ लागली आहे़ वडारवाडी या भागात मुकारी अलगुडे यांचा बालेकिल्ला आहे़ हा भागच अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़ शिवाजीनगर गावठाण हा बाळासाहेब बोडके यांना मानणारा भाग आहे़ राजू पवार यांचा मॉडेल कॉलनीचा काही भाग या प्रभागात आला आहे़ सिद्धार्थ शिरोळे यांची सर्व भिस्त भाजपाच्या पारंपरिक मतदारांवर आहे़ मनसे चैतन्य दीक्षित यांचीही भिस्त राज ठाकरे यांच्या करिष्म्यावर आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद इरकल यांनी बंडखोरी केली आहे़ त्याचा बोडके यांच्या मतावर किती परिणाम होतो, हे पाहावे लागणार आहे़ या प्रभागातील ब गटातून शिवसेनेच्या नीता मंजाळकर आणि भाजपच्या नीलिमा खाडे या विद्यमान नगरसेविका परस्पराविरुद्ध लढत देत आहे़ याशिवाय या प्रभागात काँग्रेसचे नारायण पाटोळे, मयूरी शिंदे, आयशा सय्यद या निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ राष्ट्रवादीचे प्रशांत सावंत, हेमलता महाले, मंगला पवार, भाजपाच्या प्रा. ज्योस्त्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, शिवसेनेच्या अस्मिता शिरोळे, अरविंद कांबळे, मनसेच्या सोनम कुसाळकर, राजेश नायडू आणि विनया दळवी निवडणूक लढवित आहेत़ या प्रभागात भाजपाने जुन्या प्रभागातील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे वडारवाडी, मॉडेल कॉलनी भागाला प्रतिनिधीत्व न दिल्याने या भागातील भाजपाचे कार्यकर्ते नाराज होते़ त्याचा परिणाम उमेदवारांवर किती होतो आणि पारंपरिक मतदार किती प्रमाणात बाहेर पडतात, यावर या प्रभागातील निकाल फिरू शकतो, असे सध्याचे वातावरण आहे़
चौघांमधील तुल्यबळ लढतीने रंगत
By admin | Updated: February 16, 2017 03:30 IST