लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रीतसर भाडे दिल्यानंतरच शिवाजी रस्त्यावर फळेविक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. दिवसाला चारशे रुपये अधिक जीएसटी भाडे आकारण्याचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत पथारी व्यावसायिक पंचायतीने ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पथारी व्यावसायिक पंचायतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर डाॅ. आढाव यांच्या उपस्थितीत सोमवारपासून (दि. ४) बेमुदत उपोषण सुरू केले. या वेळी सरचिटणीस बाळासाहेब मोरे, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांच्यासह पथारी व्यावसायिक उपस्थित होते.
शिवाजी रस्त्यावर ४०० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी अमान्य आहे त्यापेक्षा कमी रक्कम करा या मागणीसह शिवनेरी रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांना जागा मिळालीच पाहिजे. टाळेबंदीच्या काळातील भाडे रद्द केले पाहिजे आणि परवाना मिळाला पाहिजे या मागण्या करण्यात आल्या.
चौकट
५ ते ६ हजार नफा घेता, भाड्याला का नकार देता?
“शिवनेरी रस्त्यावरील फळविक्रेते दिवसात निव्वळ ५ ते ६ हजार रुपये नफा मिळवत आहेत. बाजार समितीच्या मालकीची जागा ही गेल्या अनेक वर्षांपासून विनामोबदला वापरली आहे. पाचशे रुपये आणि जीएसटीएवढे अतिक्रमण शुल्क आकारले होते, मात्र त्यात आम्ही तडजोडीची भूमिका म्हणून ४०० रुपये आणि त्यावर जीएसटी असे अतिक्रमण शुल्क आकारले आहे. बाजार समितीने केलेली कारवाई कायदेशीर असून, योग्यच आहे.”
- मधुकांत गरड, प्रशासक पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
चौकट
वयोवृद्ध डाॅ. आढाव यांचा गैरवापर?
गेल्या अनेक वर्षांपासून डाॅ. बाबा आढाव मार्केट यार्डातील कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी लढत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत तोलणाराचा प्रश्न असो की शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या पथारी व्यावसायिकांचे उपोषण प्रत्येक ठिकाणी डाॅ. बाबा आढाव आंदोलनात उतरताना दिसतात. बाजार आवारात अनेक तोलणार कोणत्याही स्वरूपाचे काम न करता शेतकऱ्यांच्या पट्टीतून पैसे घेत आहेत, त्याकडे बाबांचे दुर्लक्ष का, शिवाजी रस्त्यावर गेली अनेक वर्षे फुकट व्यवसाय करणारे चांगला नफा कमवत असताना बाबा त्यांच्या बाजूने कसे, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. वयोवृद्ध डॉ. बाबा आढाव यांची दिशाभूल करुन त्यांचा गैरवापर तर केला जात नाही ना, याची चर्चा सध्या बाजार घटकांमध्ये चालू झाली आहे.