पुणे : गेल्या ४० वर्षांपासून दौंडकर करीत असलेली ‘पुणे-दौंड’ उपनगरीय प्रवासी वाहतूक सेवेची प्रतिक्षा आता निश्चितपणे संपली असून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते येत्या शनिवारी २५ मार्चला पुणे-दौंड मार्गावर ‘डेमू’ला (डिझेल मल्टिपल युनिट) हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा उपनगरीय सेवेप्रमाणे पुणे-दौंड उपनगरीय सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. पुणे-मिरज-लोंंढा मार्गाचे दुहेरीकरण, पुणे स्टेशनवरील सोलर पॉवर प्रकल्प, पुणे स्टेशनवरील वाय-फाय सुविधा, पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरण, पाण्यावरील पूनर्प्रक्रिया प्रकल्प आदी प्रकल्पांचे उदघाटन व लोकार्पण प्रभू यांच्या हस्ते केले जाणार आहे. हा कार्यक्रम कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे होणार आहे. याचवेळी प्रभू पुणे-दौंड गाडीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यानंतर ती पुणे स्टेशनहून दौंडसाठी रवाना होईल.जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पुणे विभागात ‘डेमू’चे तीन रेक दाखल झाले आहेत. त्यामुळे याद्वारे उपनगरीय सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला होता़ दरम्यान, पुणे-दौंड मार्गावर डेमूद्वारे (डिझेल मल्टिपल युनिट) उपनगरीय (लोकल) प्रवासी सेवा देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर, प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा तीन महिन्यांपासून केली जात होती़ (प्रतिनिधी)
चाळीस वर्षांची लोकलची मागणी पूर्ण
By admin | Updated: March 24, 2017 03:54 IST