खोडद : अत्यंत अवघड व कठीण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला जुन्नर तालुक्यातील शिवनेरी ट्रेकर्सच्या साहसी तरुणांनी नुकताच सर केला आहे.
केवळ शेतीच्या मातीशी नाळ जोडलेली असताना देखील गिर्यारोहणाची आवड असलेल्या जुन्नर तालुक्यातील काही निवडक तरुणांनी गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आपली आवड जोपासत आजवर अनेक गड-किल्ले सर केले आहेत.
तैलबैला किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ३ हजार ३३२ फूट आहे. तैलबैला किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग असून पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगांमध्ये आहे.
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हारसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यांपैकी एक रचना म्हणजे डाईक तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर. तैलबैलाची भिंत साधारणपणे ३३१० फूट उंच असून उत्तर - दक्षिण अशी पसरलेली आहे.
या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. या दोन्हीही भिंतीचे प्रस्तारोहनाचे नेतृत्व हिवरे तर्फे नारायणगाव येथील तरुण शेतकरी नीलेश खोकराळे व किशोर साळवी यांनी केले. अनिल काशिद,संतोष डुकरे,ओंकार मोरे,विकास सहाणे,अंकित पठारे यांनी या ट्रेक मध्ये सहभाग घेतला.
शिवनेरी ट्रेकर्स ही जुन्नर तालुक्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील प्रशिक्षित तरूणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली स्वयंसेवी संस्था आहे. यात राज्यभरातील २५० हून अधिक ट्रेकर व गिर्यारोहक तरूण-तरूणींचा समावेश आहे. सह्याद्री व हिमालयीन साहस मोहिमांसोबतच साहसी तरुणाईचा कौशल्य विकास, आपत्कालीन मदत, दुर्ग व ऐतिहासिक वारसा संवर्धन आदी क्षेत्रात हा समूह कार्यरत आहे.
जुन्नरचे जबाबदार ट्रेकिंग गिर्यारोहण
गेल्या काही दशकांपासून जुन्नर ही ट्रेकिंग व गिर्यारोहणाची पंढरी ठरत आहे. या भागातील हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, सिंदोळा, निमगिरी, जीवधन, नारायणगड, नानाचा अंगठा, हटकेश्वर, वानरलिंगी, ढाकोबा असे अनेक किल्ले, सुळके, कातळभिंती, घाटवाटा साहसवीरांना खुणावत आहेत. या संबंधित उपक्रमांना शिस्त व जबाबदार पर्यटनाची जोड देण्यासाठी स्थानिक वनविभागासोबतच सह्याद्री गिरिभ्रमण, शिवाजी ट्रेल, जुन्नर पर्यटन विकास संस्था, शिवनेरी ट्रेकर्स आदी संस्था प्रयत्नशील आहेत.
"पर्यटनासोबतच व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी साहसी खेळ, मोहिमा महत्वाच्या असतात. तरुणांनी यासाठी किमान मूलभूत प्रशिक्षण घ्यायला हवे. केंद्र सरकारच्या हिमालयातील विविध संस्थांमध्ये याचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. याशिवाय इतर व्यक्ती किंवा संस्थांसोबत ट्रेक वा गिर्यारोहण मोहिमांत सहभागी होताना संबंधित व्यक्ती प्रशिक्षित व अनुभवी आहेत का याची खात्री करावी,अनावश्यक धाडस करू नये."
- नीलेश सोपान खोकराळे , गिर्यारोहक
हिवरे तर्फे नारायणगाव,
अत्यंत अवघड व कठीण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला जुन्नर तालुक्यातील शिवनेरी ट्रेकर्सच्या साहसी तरुणांनी नुकताच सर केला आहे.
दुसऱ्या छायाचित्रात तैलबैला सर करताना नीलेश खोकराळे.