पिंपरी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाकडे सत्ताधारी नेते आणि प्रशासनाने पाठ फिरविल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून, हा कार्यक्रम शासकीय नव्हता. महात्मा फुले पुतळा परिसरात चुकून मंडप उभारल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामागे महात्मा फुले यांचा पुतळा आहे. शुक्रवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असल्याने पुतळा परिसरात महापालिकेच्या वतीने मंडप उभारला होता. त्यामुळे नागरिकांना येथे सावित्रीबाईच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आहे, असा समज झाला. त्यामुळे सायंकाळी काही कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनाकडे विद्यमान महापौर शकुंतला धराडे, आयुक्त दिनेश वाघमारे, नियोजित महापौर नितीन काळजे यांनी पाठ फिरविल्याविषयी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)शासकीय परिपत्रकात शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या वतीने साजऱ्या करावयाच्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीची यादी दिली आहे. त्यात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन नाही. त्यामुळे महापालिकेचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. त्यामुळे महापौर आणि प्रशासन उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचा विसर
By admin | Updated: March 11, 2017 03:18 IST