पुणे : रविवारचा दिवसही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चेतच घालवला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सकाळी दिलेले एक पत्र वगळता दिवसभर काहीही हालचाली झाल्या नाहीत. रात्री मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार यांच्यासमवेत उशिरापर्यंत बैठक सुरू होती, पण त्यातही फक्त चर्चाच झाली. आघाडीचा निर्णय लवकर होत नसल्याने आता दोन्ही पक्षांमधील इच्छुक नेत्यांवर वैतागले असल्याचे दिसते आहे.बागवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांना रविवारी सकाळी एक पत्र दिले. त्यात त्यांनी ६७ जागांची मागणी केली असून या जागांचा प्रभागनिहाय तपशीलही दिला आहे. ‘आमच्या बाजूने आता आम्ही लेखी दिले आहे, त्यावर त्यांनी निर्णय जाहीर करायचा आहे,’ असे बागवे यांनी सांगितले. या जागांच्या तपशिलाची माहिती देण्यास नकार दिला, मात्र आम्ही आमच्याच जागा मागत आहोत, त्यात वावगे असे काहीच नाही, असे ते म्हणाले. या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात दिवसभर चर्चा सुरू होती. पक्षाचे पालिकेतील प्रमुख पदाधिकारी, शहराध्यक्षा वंदना चव्हाण, तसेच पक्षाचे आमदार यांची मते पवार यांनी जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेससाठी ६० जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या नगरसेवकांच्या जागा राष्ट्रवादीकडे राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. नेमक्या याच जागा काँग्रेसने मागितल्यामुळे आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. त्या नगरसेवकांना खुद्द पवार यांनीच शब्द दिल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. त्या प्रभागातील दोन जागा काँग्रेसला देण्याची तयारी पवार यांनी दाखविली आहे, मात्र कोंढवा व अन्य परिसरातल्या काही प्रभागांमधील सर्वच जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. सर्व नाही तर किमान ३ जागा तरी द्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे, पण पवार यांची त्याला तयारी नाही. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या बैठकीत यावर काही निर्णय होत नव्हता. काँग्रेसकडून दिवसभर व नंतर रात्रीही राष्ट्रवादीच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात होती. आघाडी तुटलीच तर त्यासाठी ते जबाबदार असतील, आम्ही नाही असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काँग्रेस तडजोडीस तयार नाही, अशी माहिती देण्यात आली. रात्री उशिरा काँग्रेसने काही जागा सोडण्याची तयारी दर्शवून त्या बदल्यात अन्य जागा वाढवून मागितल्या असल्याचे समजले, मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, आघाडीचा निर्णय होत नसल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुक नेत्यांवर वैतागले असल्याचे दिसते आहे.(प्रतिनिधी)
आघाडीची बिघाडी कायम
By admin | Updated: January 30, 2017 03:11 IST