अवसरी : ‘‘परराष्ट्र धोरणांतर्गत घेण्यात येणारे निर्णय प्रत्येक वेळी राष्ट्रीय हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून घेतले जातात, असे नाही तर अनेक वेळा त्यात देशांतर्गत राजकारण असते. यावर सखोल चिंतन होऊन राष्ट्राचे हितप्रधान मानले गेले, तरच शाश्वत परराष्ट्र धोरण आकारास येईल. राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करण्यासाठी पररराष्ट्र धोरण हे प्रमुख साधन असते,’’ असे मत प्रा. डॉ. विजय नारखेडे यांनी व्यक्त केले.मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले विद्यापीठाने विकास मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे बदलते परराष्ट्रीय धोरण या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. याप्रसंगी व्यासपीठावर उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव व डॉ. विजय नारखेडे, प्राचार्य विजयराव नलावडे, बाळासाहेब बाणखेले, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मणराव घोलप, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विष्णुपंत देशमुख, चर्चासत्राचे संयोजक प्रा. भाऊसाहेब सांगळे व प्रा. वैशाली सुपेकर, तसेच कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पारधी उपस्थित होते. राष्ट्रीय हितसंबंधाला परराष्ट्रीय धोरणाचा पाया असे म्हटले जाते. परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, स्वरूप आणि दिशा राष्ट्रीय हितसंबंधाच्या आधारावरच निश्चित केली जातात्, असे विचार पुणे येथील एम. आय. टी. स्कूल आॅफ गव्हर्न्मेंट प्रमुख डॉ. माया सुधाकर परिमल यांनी व्यक्त केले.प्रा. भाऊसाहेब सांगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रद्धा महाकाळ व प्रा. सचिन मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वैशाली सुपेकर यांनी आभार मानले. चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी प्रा. तानसेन रणदिवे व प्रा. डॉ. संतोष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
हितसंबंधाच्या संरक्षणासाठी परराष्ट्र धोरण गरजेचे
By admin | Updated: February 14, 2017 01:39 IST