पुणे : गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांकडून वाटप केल्या जाणाऱ्या प्रसादाकडे अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष असणार आहे. यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, वेळप्रसंगी तपासणी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे अघटित घटना घडण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासारख्या जिव्हाळा असणाऱ्या सणाला गालबोट लागू नये यादृष्टीने कार्यवाही केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन सहसचिव शशिकांत केकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गणपती उत्सवात विविध सार्वजनिक मंडळांद्वारे, तसेच सोसायटींमधील गणपती उत्सवामध्ये गणपतीची आरती झाल्यावर प्रसादाचे वाटप होते. या प्रसादातून नागरिकांना कोणतीही बाधा होऊ नये, यासाठी गणेश मंडळे व मिठाईविक्रेते यांना पत्रकाव्दारे आपण विकत असलेला माल चांगला असावा, यासाठी विशेष सूचना देण्यात येतील. तसेच प्रसादाचा विषय थेट लोकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने त्याबाबतीत सर्वांनीच आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे केले जाणार आहे. यासाठी एका हॉस्पिटलबरोबर करार करण्यात आला असून, त्याच्या सहकार्याने अन्न व औषध प्रशासनाकडून प्रसाद वाटणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना हँडग्लोव्हजचे वाटप करण्यात येणार आहे. गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासंदर्भात शहरातील प्रशासनाच्या विभागवार अधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रसादासंदर्भातील स्वच्छता आणि अनोळखी व्यक्तीने प्रसादाचे वाटप केल्यास तो स्वीकारताना काळजी घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. शशिकांत केकरे, सहसचिव, अन्न व औषध प्रशासन
अन्न व औषध प्रशासनाचा प्रसादावर वॉच राहणार
By admin | Updated: September 17, 2015 02:49 IST