पुणे : शहरात बसविण्यात आलेल्या साडेबाराशे सीसीटीव्हीचे नियंत्रण करण्यात येत असलेल्या आयुक्तालयामधील कमांड सेंटरची उपयुक्तता वाढवून त्याचा अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वापर करण्याच्या सूचना राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतूक नियमभंगाच्या कारवायांची संख्या वाढविण्यासंदर्भातही दीक्षित यांनी आदेश दिले. दीक्षित यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. या वेळी पोलीस आयुक्त के. के. पाठक, सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, प्रकाश मुत्याळ, प्रदीप रासकर यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते. पोलीसमित्र संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवून त्यांना पोलिसांच्या कामात सहभागी करून घ्यावे. कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच छेडछाड व अन्य गुन्ह्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. पोलीसमित्रांचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भातही दीक्षित यांनी सूचना दिल्या. आगामी नऊ महिन्यांमध्ये पुणे पोलीस दलाला १ हजार ८०० कर्मचारी देण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याची मागणी लक्षात घेऊन त्यांना कर्मचारी पुरवण्यात येतील. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून मागील आठवड्यात ३७० ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिण्यात आली होती. सायबर गुन्ह्यांना प्रतिबंधासाठी तसेच हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्याही सूचना दीक्षित यांनी दिल्या. शहर आणि लगतच्या ३० परिसरांमध्ये गुन्हे घडण्याची दाट शक्यता असल्याने या ठिकाणांची पाहणी करून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणांवर विजेची व्यवस्था करण्यासोबतच गुन्हे घडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कमांड सेंटरची उपयुक्तता वाढवण्यावर भर द्या
By admin | Updated: October 27, 2015 01:08 IST