पुणे : शहरातील अनेक उड्डाणपुलांचे जोड खराब झाले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच या जोडदुरुस्तीची मोहीम सुरू करण्यात येणार असून त्यात पुलांचीही तपासणी होणार आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून ही माहिती देण्यात आली.राजाराम पूल, गरवारे महाविद्यालयाशेजारचे एस. एम. जोशी व स्वातंत्र्यवीर सावरकर पूल व अन्य काही पुलांचे जोड खराब झाल्यामुळे पुलावर आडवी रेघ असलेला मोठा खड्डा तयार झाला आहे. पुलाचा रोज वापर करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा शारिरीक त्रास होत आहे; त्याचबरोबर वाहनेही मोठ्या संख्येने नादुरुस्त होत आहेत. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त गुरुवारच्या अंकात छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते.महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या अखत्यारीत हे पूल येतात. त्यांच्याकडून बातमीची दखल घेण्यात आली. या विभागाचे अधीक्षक अभियंता विजय शिंदे याबाबत म्हणाले, ‘‘पुलावरचे डांबरी लेअर व हा जोड एकाच लेव्हलला असणे अपेक्षित आहे. पूल नवा असताना ते तसेच असतात. कालांतराने ते खराब होतात. नव्याने डांबरीकरण करताना ते पूर्वीसारखे केले जाणे आवश्यक असते; मात्र तसे होत नाही व नंतर खड्डा वाढत जातो.’’शास्त्रीय तत्त्वानुसार हा जोड मोकळा ठेवणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. वातावरणाचा परिणाम म्हणून सिमेंट प्रसरण व आकुंचन पावत असते. अशी मोकळी जागा ठेवली नाही, तर त्यातून संपूर्ण बांधकामाला तडा जातो. त्यामुळे मोकळी जागा ठेवावीच लागते, असे शिंदे म्हणाले. आता काही पुलांवरचे जोड खराब झाले आहेत. ते दुरुस्त करण्याची मोहीम सुरू करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
उड्डाणपुलांचे जोड नीट करणार
By admin | Updated: April 14, 2017 04:32 IST