भोसरी : रात्री साडेआठची वेळ. अचानक पंधरा-वीस जणांचे टोळके समोर, त्यांच्या हातात कोयते, काठ्या, धारदार शस्त्रे. समोर दिसेल त्याला धमकवायला सुरुवात होते. दिसेल ती वाहने, दुकाने फोडण्यास सुरुवात होते. दहशत निर्माण केली जाते; जणू काही एखाद्या हिंदी चित्रपटातील प्रसंग भासावा. ही परिस्थिती शुक्रवारी रात्री भोसरीतील नागरिकांनी अनुभवली.रात्री दहशत माजविणाऱ्यांपैकी सोन्या काळभोर टोळीतील सोमनाथ काळभोर, तेजस मंडलिक, याच्यासह अमोल सोनवणे, विकास कांबळे, विवेक सोमवंशी या पाच जणांना पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. किरकोळ कारणावरून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शुक्रवारी रात्री ८च्या सुमारास भोसरीतील संत तुकारामनगर, सिद्धेश्वर शाळा परिसर व मानस सरोवरनगर या परिसरात काही अज्ञात तरुणांनी काठ्या, कोयत्या घेऊन दहशत माजवली. नागरिकांना वेठीस धरून साडेआठ ते साडेनऊपर्यंत १५ ते २० लोकांचे टोळके या परिसरात फिरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत होते. या टोळक्यांनी अनेक नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. घाबरलेल्या नागरिकांनी पोलीस कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, पोलीस येण्याअगोदर दहशत माजवून दुचाकीवरून टोळके फरार झाले. या प्रकारामुळे येथील नागरिकांना रात्रभर भीतीचा सामना करावा लागला. भीतीपोटी नागरिक माहिती देण्याचे टाळत होते. या घटनेमुळे भोसरीत रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिक घराबाहेर पडले. (वार्ताहर)काही सजग नागरिकांच्या माहितीवरून कानाराम भाटी यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आकुर्डीतील सोन्या काळभोर टोळीतील अजय काळभोर, सोम्या ऊर्फ सोन्या काळभोर, आकाश गोरे, अमोल सोनवणे, विकास कांबळे, स्वप्निल जाधव, तेजस ऊर्फ पांगळ्या मंडलिक, टोपणनाव असलेले खाक्या, बाळ्यासह आणखी सात ते आठ जण, रा. सर्व जण निगडी असे एकूण १६ ते १७ व्यक्तींवर दंगा करणे, दहशत पसरविणे, धारदार शस्त्रांचा वापर करून धमकावणे, नागरिकांच्या तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कानाराम भाटी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. सहायक आयुक्त मोहन विधाते, पोलीस निरीक्षक गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश आव्हाड तपास करत आहेत.
दहशत माजविणाऱ्या पाच आरोपींना अटक
By admin | Updated: October 11, 2015 04:26 IST