उरवडेमधल्या एसव्हीएस या कंपनीमध्ये आज दुपारी आग लागली. सॅनिटायझर आणि इतर केमिकल बनवणाऱ्या या कंपनीमध्ये साधारण ४१ कामगार कामाला होते. दुपारी अचानक आग लागली तेव्हा बाहेरच्या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर पळता आले. त्यांनीच माहिती दिल्यावर स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत अक्षरशः भिंत फोडली. बाहेरच्या भागात असणाऱ्या सर्वांना स्थानिकांनी मदत करत बाहेर काढलं. पण आतमध्ये लॅब आणि थेट केमिकल असणाऱ्या भागात काम करणारे कर्मचारी मात्र दुर्दैवी ठरले. त्यांना ना पळून जाण्याची संधी मिळाली ना कोणती मदत त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकली.
तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ज्या भागात हे कर्मचारी काम करत होते, त्याच भागात त्यांचे मृतदेह आढळून आले. एक मृतदेह लॅबमध्ये तर इतर जिथे वॉटर प्युरिफिकेशनच काम सुरू होते तिथे सापडले. नेहमीप्रमाणे कामावर आलेल्या या कामगारांचं फक्त कोळसा झालेलं शरीर बाहेर आलं.