ऑनलाइन लोकमतदेहूगाव, दि. 12 - अखिल वैष्णवांचा देव पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या 332व्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, चांदीची पालखी, पालखी रथ, अब्दागिरी, दंड, गरूडटक्के, विठ्ठल रुक्मिनी मंदिरातील महिरपाला आज रांका ज्वेलर्सच्या 40 कारागिरांनी चकाकी देण्याचे काम केले. या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख अभिजित मोरे, सुनिल दिगंबर मोरे,जालिंदर मोरे,अशोक निवृत्ती मोरे, संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, संभाजी मोरे आदी उपस्थित होते. आठवड्यापूर्वीच खडकी येथील 512 वर्कशॉपमधून दुरुस्ती देखभाल करून पालखी रथ देहूनगरीत दाखल झाला होता. या रथाला दुपारी एकच्या सुमारास पालखी रथाला चकाकी देण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. रांका ज्वेलर्सच्या कारागिरांनी अवघ्या काही वेळात पारंपरिक पद्धतीचे चकाकी देण्यासाठीचे मिश्रण रांकां ज्वेलर्सचे प्रतिनिधी असलेले अनिल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाने रिठे, चिंच आणि लिंबू यांचे मिश्रण तयार केले. यासाठी रिठे, चिंच व लिंबू यांचा रस काढण्यात आला आणि त्यापासून पारंपरिक पद्धतीने त्याला उष्णता देऊन त्याचे पक्के मिश्रण तयार केले. या तयार झालेल्या मिश्रणात पाणी मिसळून काम करण्यास योग्य प्रकारचे मिश्रण तयार केले. यानंतर रांका यांच्या कारागिरांनी चकाकी देण्याच्या कामास सुरुवात केली. तयार झालेल्या मिश्रणाचा लेप पालखी रथाच्या चांदीवर लावण्यात आला. त्यानंतर पालखी रथाच्या चांदीला रिठे व चिंचेच्या पाण्याने व राळ यांच्या सहाय्याने घासण्यात आले. त्यानंतर रथाबरोबरच श्री संत तुकाराम महाराजांची पालखी,अब्दागिरी व चांदीचा चोपदाराचा दंड यांना चकाकी देण्यात आली. हे काम झाल्यानंतर या कारागिरांनी विठ्ठल-रुक्मिनी मंदिरातील मेघडंबरी, शेषनाग, मखर श्रींची चांदीची आभूषणे,पूजेचे थाळ, तांब्याची समई यांना चकाकी देण्यात आली. श्रीसंत तुकाराम महाराज व माऊली हे वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने आम्ही हे काम रांका ज्वेलर्स यांच्याकडून 40 कारागिरांनी सेवाभावी वृत्तीने आणि स्व इच्छेने केले असल्याचे रांका यांचे प्रतिनिधी अनिल सोळंकी यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Updated: June 12, 2017 17:43 IST