खडकी : खडकी परिसरात विविध मंडळाने पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक देखावे सादर केले आहेत. तरी सामाजिक संदेश देणाऱ्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण मात्र अधिक आहे. मित्र सागर मंडळाने यंदा ३० कलाकारांचा पावन झालेली घोडखिंड असा छत्रपती शिवाजी महाराजांवरील जिवंत ऐतिहासिक देखावा सादर केला आहे. उत्कृष्ट सजावट, नेपथ्य, आकर्षक मांडणी अशा विविध रूपांनी हा देखावा खडकीसहित सर्व पुणेकरांचे लक्ष्य खेचून घेत आहे. २० फूट बाय ६० फूट उंचीचा असा भव्य सेट अतिशय कमी जागेत, परंतु यशस्वीरीत्या शिवकालीन काळात घेऊन जाण्यात मंडळ यशस्वी ठरले आहे. नवीन अगरवाल अध्यक्ष असून, तुषार गांधी कार्याध्यक्ष आहेत. धोबीगल्ली मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी जम्मू काश्मीर येथील शिवखोरी गुंफा व शिवदर्शन हा भव्य देखावा सादर केला आहे. मंडळाचे ८०वे वर्ष असून, हा भव्य देखावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच रात्रंदिवस मेहनत घेऊन तयार केला असून, कल्पकतेचा सुरेख वापर यात दिसत आहे. मंडळाचे ढोल-लेझीम पथक असून, विविध सामाजिक प्रश्नांवर मंडळाचा पुढाकार असतो. मंडळाच्या वतीने वर्षभरात रक्तदान, अन्नदान, शालेय साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. जयंत गरसुंद मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारतीय मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी लोकमान्य टिळक यांच्या संकल्पनेतील आधारित उत्सव असा जिवंत देखावा सादर केला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक यांच्या दृष्टिकोनातील उत्सव व आज साजरे होणारे उत्सव यांमधील फरक दाखविण्यात आला आहे. प्रवीण पिल्ले मंडळाचे अध्यक्ष आहेत. नवी तालीम नूतन तरुण मंडळाने यंदा ऐतिहासिक महाल सजवत देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदा १०८वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने शिवजयंती, आंबेडकर जयंती, आरोग्य तपासणी शिबिर यांचे आयोजन केले जाते. मंडळाच्या वतीने ढोल-ताशा संघ तयार केला असून, ते निर्भीड संघ नावाने प्रसिद्ध आहे. मंडळाचे माउली यादव कार्याध्यक्ष आहेत. शिवाजी पुतळा परिसरातील दि नॅशनल यंग क्लब मंडळाने यंदाही सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा सादर केला आहे. एकात्मतेचा संदेश या संकल्पनेवर आधारित हा देखावा गर्दी खेचत आहे. या देखाव्यात मंडळाच्याच सदस्यांनी भूमिका केल्या असून, तो परिणामकारक ठरत आहे. गेली अनेक वर्षांपासून हे मंडळ जिवंत देखावे सादर करीत आहेत. सौरभ गोणेवार अध्यक्ष, राकेश काळे उपाध्यक्ष व फ्रान्सिस डेव्हिड कार्याध्यक्ष आहेत. गोपी चाळ परिसरातील विकास मित्र मंडळाने सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा सादर केला आहे. चांदा ते बांदा शिक्षणाचा वांदा या संकल्पनेवर आधारित देखावा आहे. लहान मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न, महाविद्यालयीन शिक्षणाची वाढती फी व डोनेशन, त्यामध्ये होणारा भोंगळ कारभार व एकूणच शिक्षणव्यवस्थेवर आधारित भाष्य करून देखावा परिणामकारक ठरत आहे. अजय चव्हाण अध्यक्ष आहेत. (वार्ताहर)
खडकीत जिंवत देखाव्यांवर भर
By admin | Updated: September 22, 2015 03:07 IST