लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरासाठी समान पाणीपुरवठा योजनेअतंर्गत पाण्याच्या टाक्यांच्या कामासाठी दिलेली स्थगिती अखेर शासनाने उठवली. शासनाच्या या निर्णयामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे काम पुन्हा सुरू होणार आहे. पुणेकरांना २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महापालिकेच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजना राबविण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागांत ८२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. काही टाक्यांचे काम प्रत्यक्ष सुरूदेखील झाले होते. मात्र, टाक्यांच्या कामांच्या निविदा प्रकियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुण्यातील आमदारांनी अधिवेशनात केला होता. त्यानंतर या कामाला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे गेल्या १० मार्चपासून हे काम बंद आहे. टाक्यांचे काम बंद पडल्याने सत्ताधारी भाजपाला मात्र त्यावरून सातत्याने टीकेला सामोरे जावे लागत आहे. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून स्थगिती उठविण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना ही स्थगिती उठविण्याबाबत प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. उपसचिव सं. श गोखले यांनी लेखी पत्र पाठवून स्थगिती उठविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा
By admin | Updated: May 10, 2017 04:26 IST