पुणे : भावावर झालेली करणी दूर करण्याचे आमिष दाखवून १६ वर्षीय मुलीला तलवारीचा धाक दाखवून वेळोवेळी बलात्कार करणार्या भोंदूबाबा अतुल महाराज उर्फ अतुल आप्पासाहेब शितोळे (वय ३३, रा. गंगा अपार्टमेंट, आकुर्डी) याच्याविरूद्ध डेक्कन पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष सत्र न्यायाधीश एस.डी. दरणे यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.त्याच्यावर बलात्कार, फसवणूक, बाललैगिंक अत्याचारविरोधी कायदा तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व आघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुुलीच्या लहान भावाला मधुमेह झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची आई एक दिवस दिवेघाट येथील कानिफनाथ मंदिरात गेली होती. तिथे त्यांना शितोळे भेटला. तुमच्या मुलावर करणी झाली आहे. ती मी दूर करुन देतो असे सांगितले. त्याने अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या आईचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्याबरोबर फोनवर वारंवार संपर्क ठेवला होता. तिच्याबरोबर गोड बोलून तिला सेनापती बापट रोड येथून लवासा रोडवर निर्जनस्थळी येथे नेले. करणी जाण्यासाठी तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला सोन्याचे पाणी पाजून करणी जाईल असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. तिच्याबरोबर खोटे लग्न केल्याचे भासविले. तिच्या अंगावर तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि तिच्या आईकडील १५ तोळ्याचे दागिने परत देतो असे सांगून त्यांची फसवणूक केली. पीडित मुलीच्या आईने अंधश्रद्धा निर्मुलन समिती व महिला दक्षता समितीच्या मदतीने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी भोंदूबाबाविरूद्ध आरोपपत्र दाखल
By admin | Updated: June 11, 2014 00:05 IST