लोकमत न्यूज नेट वर्क
पुणे : सहनिबंधक पुणे शहर कार्यालयाने विनापरवाना सावकारी केल्यावरून विजय पाचपुते याच्याविरोधात चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. औंध तसेच बदलापूर येथील महिलांनी त्याच्याविरोधात सहकार खात्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून पुण्यातील त्याच्या चार कार्यालयांवर छापा टाकला. त्यात सापडलेल्या कागदपत्रांवरून तक्रार दाखल केली.
सहकार उपनिबंधक, पुणे शहर १ दिग्विजय राठोड यांनी ही माहिती दिली. त्यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली. विजय पाचपुते याच्या हडपसर, शनिवार पेठ तसेच मॉडेल कॉलनी येथील कार्यालयावर छापे टाकले. त्यात तो विनापरवाना सावकारी करत असल्याचे निदर्शनास आले.
रायगड,नेरळ, मळवली येथील काही जणांच्या शेतजमिनी बळकावल्याचे हे प्रकरण आहे. शीला मधुमल (औंध, पुणे) तसेच अमृता देशमुख (बदलापूर) या महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या निकटच्या नातेवाईकाची जमीन थोड्या रकमेच्या बदल्यात पाचपुते याने बळकावली होती, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.