मंचर : शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या डोक्यात जात व धर्म घातल्याने हक्काची लढाई मागे राहिली आहे. सरकारकडे नोकरदारवर्गाच्या वेतन आयोगासाठी पैसा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही. आत्महत्या थांबावयाच्या असतील तर शेतकऱ्यांनी पेटून उठून कट्टरवाद निर्माण झाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.मंचर येथे शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी यांचे विद्यमाने लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पीककर्ज या विषयावर कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दत्ता गांजाळे हे होते. अपंगांसाठी ३ टक्के निधी खर्च करा, असे कायदा सांगतो. मात्र हा खर्च कोणीच करत नाही. कायदा असूनही कायद्यासारखे वागत नाही. मंदिर व मशिदीत जरूर जा; मात्र जाताना एखाद्या अपंगाच्या घरी जाऊन त्यांना मदत करा, असे आवाहन कडू यांनी केले. शेतकरी का पेटून उठत नाही. धोरणे विरोधी असल्याने शेतकरी मरतो आहे. शेतकऱ्यांना आता गर्वसे कहो हम किसान है! हे म्हणावे लागेल. आता पेटून उठावे लागले. शेतकऱ्यांचे भले झाले तर सर्वांचे भले होईल, असा आशावाद शेवटी कडू यांनी बोलून दाखवला.या वेळी यात्रा समिती अध्यक्ष दत्ता थोरात, उपाध्यक्ष प्रविण मोरडे, डॉ. मंगेश बाणखेले, युवराज बाणखेले, लक्ष्मण भक्ते, माजी सरपंच प्रल्हाद बाणखेले, अश्विनी शेटे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात आदी उपस्थित होते. कामगार नेते बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले.(वार्ताहर)
शेतकऱ्यांची हक्काची लढाई मागे राहिली
By admin | Updated: April 29, 2017 03:59 IST