पळसदेव : भिगवण येथील गोळीबाराच्या घटनेनंतर आगामी काळात इंदापूर तालुक्यात टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. वाळू धंद्यातून अवैध माया जमविण्यासाठी पुण्यातील भाई, गँग, गावोगावचे गुंड सरसावले आहेत. दौंडनंतर भिगवण परिसरात वाळू माफियांमुळे दहशत निर्माण झाली आहे. राजकारण्यांनी स्वार्थासाठी निवडणूक काळात वाळू माफियांना पोसले. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. वाळूधंद्यातील माफियांवर अनेक प्रकारचे गुन्हे असल्याचे चित्र आहे. अगदी दरोडे, लूटमार, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.वाळू व्यवसायातून आलिशान वाहने, बंगले, उच्च राहणीमानाची सवय या माफियांना झाली आहे. त्यामुळे वाळू व्यवसायातून कोणत्याही प्रकारे पैसा मिळविण्यासाठी त्यांची धडपड आहे. त्यातूनच झालेल्या वादातून एकाला जीव गमवावा लागला. आगामी काळात यातून टोळीयुद्ध भडकण्याची भीती आहे. या व्यवसायातून कालचे मित्र आजचे शत्रू बनले आहेत. त्यामुळे उजनीचं काळं सोनं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की वाळूमाफिया हा शब्द प्रसिद्धिमाध्यमांनी निर्माण केला आहे. गुन्हा घडल्यास कोणाचीही तमा बाळगली जाणार नाही. पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल. वाळूचा विषय महसूल विभागाच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे ठेक्यासंदर्भात निर्णय घेण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. दौंडचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)
टोळीयुद्ध भडकण्याची भीती
By admin | Updated: September 30, 2015 01:27 IST