लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यामुळे विम्याची मागणी केलेल्या शेतकऱ्यांची मागणी वेगवेगळी कारणे देऊन नाकारण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांनी विम्याचे हप्ते जमा केले होते. त्यातील ३ हजार ७८२ शेतकऱ्यांनी विमा मिळावा अशी मागणी केली होती, मात्र वेळेत म्हणजे ७२ तासात ऑनलाईन मागणी केली नाही म्हणून त्यांच्यातील अनेकांची मागणीच विमा कंपनीने नाकारली असल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात तब्बल १ हजार ६७६ शेतकऱ्यांचा विमा थेट नाकारण्यात आला आहे. उर्वरित २०१०६ शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी पात्र समजण्यात आले. त्यापैकी २ हजार १४ जणांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वगैरे तयार झाले आहेत, मात्र त्यांना अद्याप विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. ९२ शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.
संरक्षित रकमेच्या साधारण ७० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते, मात्र त्यासाठी विमा कंपनीने दिलेले सर्व निकष पार पाडावे लागतात. कंपन्यांच्या नकारघंटेचा फटका १ हजार ६७६ शेतकऱ्यांना बसला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानीनंतर लगेचच ऑनलाईन तक्रार दाखल करणे शक्य होत नाही. मात्र विमा कंपनीबरोबर करार करताना त्यात याच कलमाचा प्रामुख्याने उल्लेख असल्याने त्याचाच आधार घेत विम्याची मागणी नाकारल्याचे दिसते.
चौकट
सर्व तक्रारींचे निराकरण होईल.
विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर याच संदर्भात पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली आहे. त्यात सर्व प्रकारच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित असतील. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेण्यात येईल.
राजेश देशमुख, जिल्हाधिकारी