राजानंद मोरे / पुणे शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात विविध बाजार समित्यांनी सुरू केलेले ‘रयतु बाजार‘ तसेच ‘आपला भाजीपाला’ हे प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना भावाची हमी मिळत असल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने हे प्रयोग पथदर्शी ठरत आहेत. महाराष्ट्रात शेतमाल नियमनमुक्त केल्यानंतर ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेने जोर धरला आहे. शेतकऱ्यांनी शेतातून आणलेला शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांना विक्री करणे, हा मुख्य हेतू आहे. मात्र, सध्या विविध कारणांमुळे या ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास अडथळे येत आहेत. शेतकऱ्यांच्या काही गटांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.तसेच पणन मंडळानेही ‘आठवडे बाजार’च्या माध्यमातून पहिले पाऊल टाकले आहे. मात्र, हे बाजार तुलनेने कमी असून त्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. याबाबतीत आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्य सरकार तसेच तेथील बाजार समित्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतल्याचे पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यामध्ये दिसून आले.आंध्र प्रदेश व तेलंगणा मध्ये ‘रयतु बाजार’ मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तेलगु भाषेत शेतकऱ्याला रयतु असे संबोधले जाते. आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी असे बाजार पाहायला मिळतात. पंधरा वर्षांहून अधिक काळापासून हे बाजार सुरू आहेत. विजयवाडा येथील रयतु बाजार सर्वात मोठा आहे. सुमारे साडे पाच एकर परिसरात हा बाजार पसरलेला आहे. या बाजारात सहभागी होण्यासाठी तहसिलदारांमार्फत शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. त्यानुसार त्यांना या बाजारात हंगामानुसार जागा निश्चित करून दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कसलेही पैसे घेतले जात नाहीत. येथील बाजारातील विविध शेतमालाचे भाव सकाळी राज्य शासनाचे अधिकारीच निश्चित करतात. त्यानुसार बाजार संपेपर्यंत त्या भावातच शेतमालाची विक्री करावी लागते. परिणामी, ग्राहकांकडून भाव कमी करून मागितले जात नाही. शेतकरी व ग्राहकांनाही भाव परवडत असल्याने या बाजारांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत. तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद मधील बोवेनपल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाजार समितीने मागील वर्षापासून ‘आपला भाजीपाला’ या उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. समितीने दोन खासगी कंपन्यांवर शेतमालाच्या खरेदी-विक्रीची जबाबदारी सोपविली असली तरी भावावर समितीचेच नियंत्रण आहे. एका कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतमालाची खरेदी केली जाते. हा शेतमाल समितीच्या आवार आणून तेथील केंद्रावर चांगला मालाची निवड केली जाते. या शेतमाल विक्रीसाठी शहरात ३१ ठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यासाठी सरकारने जागा उपलब्ध करून दिली आहे. दुसऱ्या कंपनीमार्फत या केंद्रावर विक्रीचे नियोजन केले जाते. या मालाचे भाव समितीकडून निश्चित केले जातात. सुमारे साडे सात हजार शेतकरी या उपक्रमाशी जोडले आहेत. ग्राहकांना परवडील असे भाव असल्याने ‘आपला भाजीपाला’ उपक्रम अल्पावधीतच प्रसंतीस उतरला असल्याचे बाजार समितीच्या सचिव व पणन उपसंचालक वाय. जे. पद्म. हर्षा यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मिळतेय भावाची हमी
By admin | Updated: November 14, 2016 02:07 IST