मोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील ६४ गावांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याअभावी शेतकरी व जनावरांचे हाल होत असल्याने विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांनी गुराढोरांसह मोरगाव-बारामती रास्त्यावरील तरडोली येथे रास्ता रोको आंदोलन केले. बारामती तालुक्यात मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. शेती सिंचन, जनावराच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पुणे जिल्हा मार्ग क्र. ६५ वरील तरडोली येथे रास्ता रोको आंदोलन केले. तालुक्यातील ६४ गावांमध्ये चारा डेपो सुरू करावेत. थकीत पीककर्ज व कृषिपंप वीजबिल माफ करावे, सरकारच्या टंचाई निवारण फंडातून पुरंधर व जानाई-शिरसाई योजनेतून पाणी सोडण्यासाठी हे आंदोलन केले होते. शेतकरी या आंदोलनात आपल्या गुराढोरांसह सामील झाले होते. या आंदोलनाची दाखल येत्या दहा दिवसांत न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा सर्वानुमते निर्णय या वेळी घेतला. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांकडे निवेदन दिल्यानंतर तासभर चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी जिरायती भाग पाणी परिषदेचे हनुमंत भापकर, अम्रता गारडे, सोमेश्वर कारखाना संचालक भरत खैरे, रघुनाथ कुतवळ, वैभव मोरे, अरविंद गायकवाड, किसन तांबे, मोरगावचे उपसरपंच दत्तात्रय डोले, मुरलीधर ठोंबरे, नामदेव कारंडे, निवृत्ती ताम्हाणे, तानाजी कोळेकर, दादा माने, रमेश भापकर, संजय पाटील व शेकडो शेतकरी उपस्थित होते. तर आंदोलनानिमित्त वडगाव निंबाळकरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.जिरायती भागात पाणी व चाऱ्याअभावी जनावरे जगवणे मुश्कील झाले आहे. यामुळे पाच गाई विकून तीन शेळ्या घेण्याची वेळ माझ्यावर आली आहे. - दत्तात्रय डोले, उपसरपंच मोरगाव
चारापाण्यासाठी शेतकरी आक्रमक
By admin | Updated: July 3, 2016 03:48 IST